राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना दुर्राणी यांनी देशातील आणि राज्यातील सद्यःस्थितीवर भाष्य केले. राजकीय परिस्थिती बदलत असून अल्पसंख्याक समाजाला डावलले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
जाती-धर्माच्या राजकारणाने लोकांच्या भावना भडकवून फार काळ सत्तेत राहता येत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी काम करणे महत्त्वाचे आहे, असे सांगत दुर्राणी यांनी परभणी जिल्ह्यात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनवण्याचे आश्वासन दिले.