क्राईम
रंग लावण्याच्या वादातून पुण्यात रक्तरंजित राडा

- पुण्यात धुलीवंदनाच्या दिवशी रंग लावण्याच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. येरवडा परिसरात घडलेल्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी सुरुवातीला तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ला प्रकरणात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगमवाडी परिसरात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. ऋतिक ननावरे आणि त्याचा 17 वर्षीय भाऊ रोहित ननावरे हे राजीव गांधी नगर परिसरातून जात असताना दोन तरुणांनी त्यांना अडवले आणि जबरदस्तीने रंग लावून डोक्यावर अंडी फोडली यामुळे रोहितने हा प्रकार आपल्या भावाला सांगितला.
- भावावर रंग टाकल्याचा जाब विचारण्यासाठी ऋतिक जेव्हा संबंधित तरुणांकडे गेला, तेव्हा वाद उफाळून आला. आरोपी बबल्या आणि त्याच्या साथीदाराने मिळून ऋतिकला मारहाण केली आणि कोयत्याने सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी ऋतिकच्या पोटात दगड घातला. या भीषण हल्ल्यात ऋतिक गंभीर जखमी झाला आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली.
- या हल्ल्यानंतर ऋतिक जेव्हा पोलीस ठाण्यात पोहोचला, तेव्हा सुरुवातीला पोलिसांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रंग पंचमीच्या दिवशी भांडण करतो का?, असा उलट प्रश्न करत पोलिसांनी तक्रार घेण्यास विलंब केला, असे ऋतिकने सांगितले.
- मात्र, दोन दिवस टाळाटाळ केल्यानंतर अखेर येरवडा पोलिसांनी बबल्या आणि त्याच्या साथीदारावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.