सोलापूर- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत इको क्लब मिशन लाइफ अंतर्गत फ्लोरा कोड उपक्रम राबविण्यात आले. परिसरातील वृक्षांना क्यू आर कोडचे रक्षाबंधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार होते. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, इको क्लबचे प्रमुख शिवकुमार शिरुर, जयश्री बिराजदार, विनायक कोरे व इको क्लबचे विद्यार्थी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली इको क्लबची स्थापना करण्यात आली असून यामध्ये परिसरातील वृक्षांना क्यू आर कोडचे रक्षाबंधन बांधून रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
हे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्या वृक्षाची आपल्या मोबाईलवर तंतोतंत माहिती मिळते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण होऊन पर्यावरणास हातभार लावता येते. विद्यार्थ्यांनी इको क्लबच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या ज्ञानात भर घालावी, असे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार शिरुर यांनी केले तर शिवानंद पुजारी यांनी आभार मानले.