राजकीय

महायुतीत तगडा ट्विस्ट!

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. यातच आता महायुतीला धक्का देणारी बातमी कोल्हापुरातून आली आहे. महायुतीचे सहकारी पक्ष म्हणून पाच वर्षे सोबत असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन मतदारसंघात बंडखोरी केली आहे. पक्षाच्या या भूमिकेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दबावतंत्र वापरत दोन जागा पदरात पाडून घेतल्यानंतर अखेरच्या क्षणी दोन जागांवर महायुतीलाच आव्हान देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याने महायुतीची वाटचाल कठीण झाली आहे.

जनसुराज्य पक्षाने जागा वाटपाच्या वेळी पंधरा जागांची मागणी केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह आणखी काही जिल्ह्यांत तिकीट मागितले होते. परंतु, भाजपने फक्त शाहुवाडी आणि हातकणंगले या दोनच जागा दिल्या. हातकणंगले मतदारसंघासाठी शिंदे गटाने जोरदार प्रयत्न केला होता. मात्र जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांच्या आग्रहापुढे मुख्यमंत्री शिंदेंना माघार घ्यावी लागली.

सांगली जिल्ह्यातील जत आणि मिरज या दोन जागांची मागणी कोरेंनी केली होती. मात्र, या जागा देण्यास भाजपने नकार दिला. बरीच ओढाताण केल्यानंतरही जनसुराज्य पक्षाला या जागा काही मिळवता आल्या नाहीत. आपण करत असलेल्या पंधरा जागांची मागणी पूर्ण होणार नाही, असे लक्षात आल्यानंतर पक्षाने काही मतदारसंघात वेगळा मार्ग निवडला.

करवीरमध्ये संताजी घोरपडे आणि चंदगडमध्ये मानसिंग खोराटे या दोघांचे अर्ज कायम ठेवण्यात आले. हे दोन्ही उमेदवार जनसुराज्यच्यावतीने मैदानात आहेत. तसेच शाहुवाडी मतदारसंघातून स्वतः कोरे आणि हातकणंगले मतदारसंघातून अशोकराव माने नशीब आजमावत आहेत. राज्यात अनेकांनी भाजपची साथ सोडली होती. मात्र, अडचणीच्या काळात कोरेंचा पक्ष भाजपबरोबर ठामपणे उभा राहिला होता. 

त्यामुळे या निवडणुकीत भाजपने कोरेंना दोन जागा देऊ केल्या. तरी देखील आणखी दोन जागांवर कोरेंच्या पक्षाने बंडखोरी केली आहे. असे असतानाही भाजपच्या नेते मंडळींकडून कोणतीही तक्रार केली जात नाही याचे सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. या मतदारसंघात बंडखोरी झाल्याने आता मैत्रीपूर्ण लढत होईल. या लढतीत कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button