- राज्यात एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करण्यासाठी पत्नीने उशीने तोंड दाबले तर तिच्या प्रियकराने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वरच्या मजल्यावर राहणाऱ्या घरमालकाला आवाज गेल्याने त्यांनी धावत बाहेर येऊन नागरिकांना आवाज दिला. हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांनी प्रियकराला चांगलाच चोप दिला. तर यावेळी पत्नी मुलासह पसार झाली आहे.
- शीला सुरेश खालापुरे (वय ३६) राहणार कोमल नगर पडेगाव, प्रियकर राजू भानुदास खैरे रा. पैठण अशी आरोपीची नावे आहेत. तर, सुरेश श्रीमंत खालापुरे (वय ४२) राहणार कोमल नगर पडेगाव हे फिर्यादी आहेत. सुरेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश हे रिक्षा चालक असून ते कुटुंबासह कोमल नगर येथे राहतात. त्यांची आरोपी पत्नी शीला ही वाळूज एमआयडीसी मधील कंपनीत काम करते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
- काही दिवसांपूर्वी शीला हिने कंपनीतील काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केले होते. शीला आणि राजू खैरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात शीलाचे पती सुरेश श्रीमंत हा अडसर ठरत होता. यामुळे दोघांनी मिळून शीलाच्या पतीचा खून करायचा प्लॅन रचला.
- दोन ऑगस्ट रोजी सुरेश हे जेवण करून पलंगावर झोपले होते. याचवेळी आरोपी शीला हिने घराचा दरवाजा उघडा ठेवून प्रियकर राजूला घरात बोलावले. राजू घरात आल्यानंतर शीलाने दरवाजा लावून घेतला. ठरलेल्या प्लॅन नुसार खून करायचा असल्यामुळे झटापटीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी शीलाने घरातील टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला.
- शीलाने सुरेश यांच्या तोंडावर उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी राजू खैरे यांनी गळा आवाळण्याचा प्रयत्न केला. तिघांमध्ये झटापट झाल्याने फिर्यादी सुरेश हे भिंत आणि पलंगाच्या मधोमध पडल्याने आरोपींना गळा आवळता आला नाही. यावेळी आरडाओरड झाल्याने वरच्या मजल्यावर राहणारे घरमालक विशाल जाधव खाली आले. त्यांनी गल्लीतील नागरिकांना बोलावले. हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांनी आरोपी राजू याला पकडत चांगलाच चोप दिला.
अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पतीला संपवण्याचा शीलाचा प्लॅन
