देश - विदेश
चमत्कार ! प्रियंका गांधींनी केले अमित शहांचे कौतुक
- राजकारणात विरोधी पक्ष नेहमीच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याच्या मूडमध्ये असतो. सरकारने एखादे चांगले काम केले तरी त्यात चुका शोधून काढण्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांची प्रवृत्ती असते. परंतु,राजकारणात दुर्मिळ असणारी घटना नुकतीच घडली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांचे कौतुक सहसा होत नाही. पण वायनाडच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. शहा यांनी फक्त 25 दिवसांत आश्वासन पूर्ण केल्याबद्दल प्रियंका यांनी आनंद व्यक्त केला आहे.
-
प्रियंका यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी शहा यांचे आभार मानले आहेत. गृह मंत्रालयाने वायनाड येथील दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी गृह मंत्रालयाचे आभार मानले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांच्या पुनर्वसनास मोठी मदत होईल, असे प्रियंका यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
- अमित शहा यांनी अखेर वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्तीचा दर्जा दिला, याचा मला आनंद आहे. पुनर्वसनाची गरज असलेल्यांना मदत होईल आणि निश्चितपणे योग्य दिशेने एक पाऊल मानले जाईल. या कामासाठी वेळेत पैसे दिल्यास आम्ही खूप आभारी राहू, असे प्रियंका यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.