वायनाडमध्ये प्रियांका गांधी यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या नव्या हरिदास आहेत कोण?
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रियांका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरलेल्या प्रियांका यांच्या विरोधात भाजपने नव्या हरीदास यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नावाची सध्या जबरदस्त चर्चा आहे.
अवघ्या ३६ वर्षांच्या नव्या हरिदास या कालिकत विद्यापीठाच्या केएमसीटी इंजिनीअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअर झाल्या आहेत. त्यांनी बीटेकची पदवी घेतली आहे. २००७ मध्ये त्यांनी पदवी घेतली. कोझिकोड महानगरपालिकेत त्या दोन वेळा नगरसेवक राहिल्या आहेत. सध्या त्या भाजपमध्ये महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत.
नव्या हरिदास यांनी आपल्या फेसबुक पेजवर स्वत:ची ओळख भाजप संसदीय पक्षाच्या नेत्या अशी करून दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडची खासदारकी सोडल्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. वायनाड पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.