- पुण्याहून अक्कलकोटच्या देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स बसचा आज सकाळी सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात झाला. कर्जाळ येथील वळसंग परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या बसने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे १५ ते २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांचा आणि पुरुषांचा समावेश असून जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
- अपघात इतका जबरदस्त होता की, बसच्या डाव्या बाजूचा मोठा भाग चक्काचूर झाला. बसमध्ये एकूण ३० ते ३५ भाविक प्रवास करत होते. धडकेनंतर झालेल्या गोंधळात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि रुग्णवाहिकांनाही तात्काळ पाचारण करण्यात आले. जखमींना अक्कलकोट आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस अतिवेगात होती आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. धडक इतकी जबरदस्त होती की, बसचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. दरम्यान, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
ब्रेकिंग! पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात
