पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला तडे

राज्यात आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे. तसेच घडू लागले आहेत. साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. जर ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.
उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत. आता उदयसिंह यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. पंरतु, येथे काँग्रेसला तडे जात आहेत. उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा, असे सांगितले आहे.
महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे. तरीदेखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे. शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी फोडले जात आहेत. तर दुसरीकडे अजितदादा पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत. तसेच आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत.