देश - विदेश
खुशखबर! देशभरातील टोलनाके लवकरच होणार बंद

तुम्हाला आता टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा दिसणार नाहीत. कारण देशभरातील महामार्गांवर गर्दीचे कारण ठरणारे टोलनाके आता बंद करण्यात येणार आहेत. फास्टॅगच्या सहाय्याने टोलनाक्यावरील वाहतूक गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तो फारसा यशस्वी होताना दिसत नाही.
परिणामी आता जीपीएस आधारित टोलवसुलीच्या मदतीने टोलनाके हटवले जाणार आहेत. प्रत्येक वाहनांमध्ये जीपीएस नंबर प्लेट्स लावण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक गतिमान करण्यासाठी जीपीएस प्रणाली खूप फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय परिवहन महामंडळ आणि आयआयएम कलकत्ता यांच्या अहवालानुसार, टोल नाक्यांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे पेट्रोल-डिझेल वाया जाते. तसेच वाहनांच्या रांगांमुळे दरवर्षी 45 लाख लोकांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत तुमच्या खिश्याला आधार मिळण्यासाठी आणि देशाचे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी जीपीएस यंत्रणा लवकरच सुरू होणार आहे.
या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत, तुम्हाला तुमच्या कारमध्ये जीपीएस यंत्रणा फिक्स करावे लागणार आहे. तुम्ही टोलनाका असलेल्या महामार्गावर वाहन आणताच, टोलची गणना सुरू होईल आणि त्या रस्त्यावर तुम्ही प्रवास केलेल्या अंतरानुसार पैसे कापले जातील. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यातून कापली जाईल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहितीही सरकारला द्यावी लागेल.
तसेच या प्रणाली अंतर्गत तुम्हाला तुमच्या वाहनाची नोंदणी करावी लागणार आहे. जीपीएस आधारित टोल प्रणालीच्या मदतीने स्थानिक लोकांना टोलवर मिळणारी सवलत बंद होऊ शकते.
जीपीएस आधारित टोल प्रणाली कार्यान्वित झाल्यास लोकांना फिक्स शुल्क भरावे लागणार नाही, तर त्यांनी जेवढा प्रवास केला आहे तेवढीच रक्कम भरावी लागेल. त्यामुळे टोलनाक्यांजवळील वाहतूक कोडींचा प्रश्न सुटणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याची लवकरच घोषणा करतील.