- जेष्ठ नेते शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या इतिहासात बारामतीकरांनी आतापर्यंत त्यांना कधीच निराश केले नव्हते. शरद पवार बोले आणि बारामती डोले अशी स्थिती तब्बल 55 वर्ष कायम होती. पण गेल्या दोन वर्षांपासून पवारांच्या राजकीय प्रतिमेला बारामतीतून धक्के बसले. पवारांचे घर राजकीय दृष्ट्या फुटले. त्यानंतर बारामतीकरांनी काका आणि पुतण्यांना आलटून-पालटून कौल दिले. त्यामुळे बारामतीकरांच्या कौलात मूळात विभागणी झाली. ती विभागणी आता अधिक रुंदावली असून ती शरद पवारांच्या अख्ख्या पॅनेलचा पराभव करण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.
- अर्थात या निवडणुकीत पवारांनी चलाखी केली होती. निवडणुकीतल्या पराभव झाल्याचे खापर सुप्रिया सुळे यांच्यावर फुटू नये. त्यांच्या नावावर पराभवाचे रेकॉर्ड तयार होऊ नये, यासाठी पवारांनी त्यांच्या बळीराजा पॅनेलचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपविले नाही. ते त्यांनी अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार याच्याकडे दिले होते. त्यामुळे जिंकून आला तर आपला नातू आणि पराभूत झाला, तर अजित पवारांचा पुतण्या, असे समीकरण पवारांनी परस्पर बसविले होते.
- या निवडणुकीतल्या पराभवामुळे युगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. अजित पवारांचा सख्खा नातेवाईक पुन्हा हरला. सुप्रिया सुळे यांचे विजयाचे रेकॉर्ड पवारांनी कायम ठेवले. पण बळीराजा हे पॅनल युगेंद्र पवारांनी तयार करून उभे केले नव्हते, तर ते शरद पवारांनी तयार करून उभे केले होते. बारामतीकरांनी त्या अख्ख्या पॅनलचा पराभव केला, ही राजकीय वस्तुस्थिती मात्र लपून राहिली नाही.
- शरद पवारांना स्वतःला कुठल्याच निवडणुकीत कधीही पराभव पाहावा लागला नाही. याला अपवाद फक्त भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या निवडणुकीचा होता. बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जगमोहन दालमिया यांनी शरद पवारांचा फक्त एका मताने पराभव केला होता. त्यामुळे कुठल्याही निवडणुकीत पवारांचा पराभव होऊ शकत नाही, हे रेकॉर्ड तुटले होते. आता माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवारांनी उभ्या केलेल्या सगळ्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर शरद पवार म्हणजे निवडणुकीत हमखास यश हे समीकरण देखील बारामतीकरांनी संपुष्टात आणले.
ब्रेकिंग! शरद पवार बोले आणि बारामती डोले, गेले ते दिवस
